रोहित फावडे यांचा राजीनामा देण्याचा इरादा
धारूर: विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने इच्छुक उमेदवार डोअर टू डोअर प्रचार करताना दिसत आहेत. येत्या २० नोव्हेंबरला होणार्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजलगाव मतदार संघात बिघाडीची स्थिती निर्माण झाली आहे. ठाकरे गटाचे युवासेना धारूर शहरप्रमुख रोहित मुकुंदराव फावडे हे आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याच्या चर्चेमुळे आघाडीला मोठा धक्का बसण्याची चिन्हे आहेत.
युवा ताकतीचे कार्यकर्ता म्हणून ओळखले जाणारे रोहित फावडे धारूर तालुक्यात मोठ्या मित्र परिवाराने समर्थित आहेत. त्यांच्या राजीनाम्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसणार असं बोललं जात आहे.
फावडे यांनी याबाबत बोलताना सांगितले की, “आम्ही महाविकास आघाडीच्या मित्रपक्ष म्हणून मोहन दादा जगताप यांचे खंबीरपणे समर्थन केले आहे, परंतु धारूर शहरात विविध स्थानिक पुढाऱ्यांकडून युवासेना पदाधिकाऱ्यांना सन्मानपूर्वक मान दिला जात नाही, त्यामुळे मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.”
मागील काही दिवसांपूर्वी धारूर शहरात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात महावि कास आघाडीचे उमेदवार जगताप यांच्या पोस्टर्सवर शिवसेना व युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांचे फोटो नसल्याने वातावरण तापले होते. त्यामुळे शिवसैनिकांमध्येसुद्धा रोष निर्माण झाला होता. या अनुषंगाने रोहित फावडे यांच्या राजीनाम्याच्या चर्चेला उधाण आले आहे.