उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी प्रा.ईश्वर मुंडे यांच्या वर पक्ष श्रेष्ठींचा दबाव राज्य प्रमुख पदाचा राजीनामा देवून निवडणूक लढवणारच – प्रा.ईश्वर मुंडे
राष्ट्रवादी कॅंग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या सेवा निवृत्त अधिकारी सेलचे राज्य प्रमुख प्रा. ईश्वर आनंदराव मुंडे यांनी माजलगाव विधानसभा मतदार संघासाठी पक्षाकडून तिकिटाची मागणी केली होती. या मागणीच्या अनुषंगाने त्यांनी स्थानिक मतदारांशी संवाद साधण्यासाठी विविध जन संवाद दौऱ्यांचे आयोजन केले होते. परंतु, पक्षाने त्यांना उमेदवारी न दिल्यामुळे, सामान्य जनतेच्या आग्रहावरून त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि त्यांच्या जन संवाद दौऱ्यांचा कार्यक्रम चालू ठेवला आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मत विभागणीचा फटका त्यांच्या अधिकृत उमेदवाराला बसू नये यासाठी प्रा. मुंडे यांच्यावर पक्षातील उच्चांकांचे दबाब वाढत आहे की त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा. परंतु, प्रा. मुंडे स्पष्ट करतात की, “आम्हाला पक्षाने तिकीट नाकारले तरी सामान्य जनतेचा पाठींबा आहे. तेच आपले तिकीट आहे. मी अपक्ष, सामान्य जनता हाच आपला पक्ष,” असे म्हणत निवडणूक लढविण्याच्या निर्णयावर ठाम आहेत.
प्रा. ईश्वर मुंडे यांनी पक्षाच्या राज्य प्रमुख, सेवा निवृत्त अधिकारी सेल या पदाचा व पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांच्याकडे पाठवला आहे.
प्रा. मुंडे यांच्या उमेदवारीमुळे माजलगाव विधानसभा निवडणुकीत रंगत वाढण्याची अपेक्षा आहे. त्यांच्या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात उत्तम प्रतिस्पर्धा निर्माण होण्याची शक्यता आहे आणि मतदारांमध्ये मोठी उत्सुकता देखील दिसून येत आहे.