पहाडी दहिफळमध्ये वाहन अडविल्यानंतर पोलिसांनी दाखल केला १० जणांवर गुन्हा उमेदवारांच्या प्रचाराची वाहने अडवाल तर जेलमध्ये जाल !
धारूर तालुक्यातील पहाडी दहिफळ येथे प्रचारास गेलेल्या उमेदवाराला परत पाठविण्यात आले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांनी स्वतःहून फिर्यादी होत १० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आता या सर्व आरोपींचा पोलिस शोध घेत असून, कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. यापुढेही कोणी असे कृत्य केल्यास कठोर कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
धारूर पोलिस ठाणे हद्दीतील माजलगाव मतदारसंघातील अपक्ष उमेदवार प्रचारासाठी गेले होते.
यावेळी त्याचे वाहन अडविण्यात आले. घोषणाबाजी करत त्यांना गावातून परत पाठविण्यात आले. आमच्या गावात प्रचार करायचा नाही, असेही त्यांनी उमेदवाराला सांगितले. याचा व्हिडीओ
सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. उमेदवाराच्या समर्थकांनीही पोलिस ठाण्यात जावून संबंधितांवर कारवाई करावी, असे निवेदन दिले होते. याची पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी गंभीर दखल घेत यातील लोकांवर कडक कारवाईच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे पोलिसांनीच व्हिडीओचा आधार घेत १० लोकांवर गुन्हा दाखल केला आहे.
उमेदवाराची वाहने अडवली होती. त्यांच्याविरोधात कलम 189(2), 126(2) भारतीय न्यायिक संहिता 2023 सह कलम
१३५ महाराष्ट्र पोलिस अधिनियम अन्वये गैरकायद्याची मंडळी जमवणे, जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आता या सर्वांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.