राजमाता जिजाऊ महाविद्यालयात ‘नवीन शैक्षणिक धोरण 2020’ विषयावर वेबिनार; डॉ. जे. ए. ननावरे यांचे मार्गदर्शन
किल्ले धारूर येथे 10 ऑक्टोबर रोजी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या राजमाता जिजाऊ महाविद्यालयात गणित विभागाच्या वतीने “करिक्युलम स्ट्रक्चर ऑफ मॅथेमॅटिक्स इन न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020” या विषयावर एक दिवसीय वेबिनार आयोजित करण्यात आला. प्रमुख वक्ते म्हणून श्रीकृष्ण महाविद्यालय गुंजोटीचे गणित विभाग प्रमुख डॉ. जे. ए. ननावरे उपस्थित होते, त्यांनी नवीन शैक्षणिक धोरणाचे महत्व स्पष्ट केले.
वेबिनारमध्ये, डॉ. जे. ए. ननावरे यांनी नवीन शैक्षणिक धोरण 2020 विषयी सखोल माहिती दिली. त्यांनी सांगितले की, या धोरणामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक जडणघडणी अधिक लवचिक झाली आहे, ज्यामुळे प्रत्येक विद्यार्थी आपल्या आवडीनुसार शिक्षण घेऊ शकतो. यामध्ये कोणतीही शाखा स्वतंत्र राहणार नसून, त्या आंतरविद्या शाखा म्हणून अभ्यासल्या जाणार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. ननावरे यांनी नवीन शैक्षणिक धोरणामध्ये झालेल्या लाक्षणिक बदलांची माहिती दिली, ज्या विद्यार्थ्यांच्या करियरच्या दृष्टीकोनातून महत्त्वाच्या ठरतील. त्यांनी उपस्थितांना ‘आधुनिक शिक्षणाची आव्हाने आणि संधी’ यावर चर्चा करण्यास प्रेरित केले.
प्राचार्य डॉ. गोपाळ काकडे यांनी या व्याख्यानाचा अध्यक्षीय समारोप करताना, “या व्याख्यानात उपस्थितांनी नवीन शैक्षणिक धोरण समजून घेतले. हे धोरण विद्यार्थीभिमुख असून सर्व विद्यार्थ्यांना आपल्या आवडीनुसार शिक्षण घेण्याची संधी देते,” असे सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात गणित विभाग प्रमुख उपप्राचार्य प्रा. महादेव जोगडे यांनी केली. यामध्ये उपप्राचार्य मेजर डॉ. मिलिंद गायकवाड, पर्यवेक्षक प्रा. सच्चिदानंद ढेपे आणि आयक्यूएसी समन्वयक डॉ. एल. बी. जाधव यांच्यासह अनेक गणित विषयाचे अभ्यासक, प्राध्यापक आणि विद्यार्थी ऑनलाइन उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अनंथा गाडे यांनी केले, तर आभार डॉ. विजयकुमार कुंभारे यांनी मानले.