कै. माजी आमदार, लोकनेते बाबुरावजी आडसकर यांची आठवी पुण्यतिथी विनम्र अभिवादन

बाबूराव आडसकर नावाचा रांगड्या व्यक्तीमत्वाचा आणि त्याला साजेशा बुलंद आवाजाचा नेता काळाच्या पडद्याआड जावून आज आठ वर्षाचा काळ लोटला आहे. राजकीय नेत्याची व्याख्याच आज समुळ बदलून गेलेली असताना आणि नेतृत्वगुण किंवा जनसंपर्क यापेक्षा भल्या बुर्‍या मार्गांनी हाती खुळखुळणारा पैसा हाच नेतेपदाचा निकष बनलेला असताना, अशा काळात बाबुराव आडसकर साहेबांची आठ वर्षपुर्वी झालेली एक्झीट ही अजूनही मनाला चटका लावणारी ठरत आहे.
गेले कित्येक वर्षे गुडघ्याच्या विकाराने त्रस्त असलेले साहेब आडस येथील बंगल्यावर विश्रांती घेत असतांना आठ वर्षांपूर्वी अचानक गेले. त्यांच्या निधनाची ती मन सुन्न करुन टाकणारी बातमी आज ही मन व्यथीत करुन सोडते, या फर्ड्या व्यक्तिमत्त्वाच्या आठवणींच्या स्मृतीगंध मनात ठेवून जाते.
सुरुवातीला केज आणि नंतर चौसाळ्यातून विधानसभेवर तर एकवेळ विधानपरिषदेवर निवडून गेलेल्या आडसकरांची मुलुखमैदानी तोफ ज्या धडाडीने प्रचारात धडधडत असे, तिची आठवण अजून माझ्या मनात ताजी आहे. ग्रामीण समाजाचे विधानसभेत प्रतिनिधित्व करणार्‍या आडसकरांचे वाक्‌पटुत्व, फारशे शिक्षित नसतानाही अनुभवातून आलेली ग्रामीण समस्यांची जाण, विधिमंडळ कामकाजातील खाचाखोचांची यच्चयावत माहिती या सार्‍या आधारावर बाबुराव आडसकर हे नाव केजच्या नव्हे तर महाराष्ट्रातील त्या काळाच्या राजकारण आणि समाजकारणात सक्रीय असलेल्या जनतेवर आपला एक वेगळाच ठसा उमटवून गेले!
त्यांच्या भाषणातील आवेश पाहण्याजोगा असे. एखादा शब्द त्वेषाच्या भरात ते असा काही उच्चारत की तो श्रोत्यांच्या मनात कायम घर करुन बसे. त्यांचा जनसंपर्कही दांडगा होता. सर्वांशी ते अगदी अकृत्रिम जिव्हाळ्याने वागत असत. एखादा विषय स्वतःला पटला की त्यावरील जनमताची पर्वा न करता ते ती बाजू उचलून धरीत. जे पटेल तेच बोलणार हा त्यांचा बाणा होता.
मृत्यू पुर्वी प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजकारणासह सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांपासूनही ते थोडे दूर गेले होते. सहसा राजकारणात वर्चस्व आणि सतत प्रकाशझोतात असे पर्यंतच एखाद्याचे वलय निर्माण होते, एकदा त्या वलयाबाहेर गेले की माणसे त्या वलयाबाहेर फेकली जातात असे दिसते. मात्र बाबुराव आडसकर साहेब त्याला अपवाद ठरले! सतत गर्दीत राहून लोकांच्या कामाला येणारा हा दर्दी नेता आपल्या कर्तृत्वातून जनसामान्यांच्या मनात कायमचं घर करुन गेला!

◼हाबाडा, टिकूरं अन बावळ्या…
————————————–
बाबुराव आडसकर साहेब हे तसे ग्रामीण वातावरण वाढलेले अन् ग्रामीण मतदारांच्या भक्कम पाठींब्याने पुढे आलेले नेतृत्व! त्यामुळे त्यांच्या भाषणात देखील अस्सल ग्रामीण तडका भरलेला असे. भारदस्त आणि फर्ड्या आवाजातील संवादफेक करताना ते एखादा शब्द आपल्या पोतडीतून असा काही काढत की तो श्रोत्यांच्या -हदयाचा ठाव घेई! विरोधकांना अस्मान दाखवा असे आवाहन करण्याऐवजी ते ‘विरोधकांना हाबाडा द्या’ असे आवाहन करीत. बीड, लातूर आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्याच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून आमदार असताना त्यांना अनेक ठिकाणी प्रचार सभेसाठी मागणी असे. सभेत मतदारांना आश्वस्त करताना ते म्हणत, तुम्ही आता कोणतेही काम घेऊन बिनधास्त माझ्याकडे या, “तीन जिल्ह्याचं टिकूरं” आता माझ्याकडे आहे. सभेच्या गर्दीत एखादा श्रोता उभा राहून मागच्यांना अडथळा करत असल्यास साहेब त्याला “ए बावळ्या, खाली बस!” असा सज्जड दम देत, तेंव्हा सभेतील सर्व सभा हास्य कल्लोळात बुडून जात असे.
लोकांची भाषा बोलणारा नेता मुक होवून आज आठ वर्षाचा कालावधी उलटून गेलाय. मात्र त्यांच्या चाहत्यांत साहेबांबध्दलचा आदर आजही तितकाच टीकून आहे, हे विशेष!
‘सत्कार्याच्या दिव्य फुलांनी,
माणवता पुजली ज्यांनी..!
अनंत त्यांची जीवन यात्रा,
कधी न सरो मरणांनी ..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *