किल्ले धारूर तालुक्यातील पदाधिकारी व सदस्यांनी व्हाइस ऑफ मीडियाच्या शिर्डी अधिवेशनास उपस्थित राहावे :- मराठवाडा विभागीय अध्यक्ष विजय चोरडिया
पत्रकार सर्वसामान्यांच्या बातम्यांना शासन व प्रशासन दरबारी मांडून त्यांना न्याय देण्याचे काम करतो. मात्र पत्रकारांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो विशेष म्हणजे त्यांची आर्थिक बाजू सक्षम नसल्यामुळे त्यांचे आर्थिक स्त्रोत वाढले पाहिजेत. तसेच ६० वर्षानंतर पत्रकारांना किमान व्यवस्थित जगता यावे यासाठी पेन्शन मिळणे आवश्यक आहे. मात्र त्यासाठी जाचक अटी लादल्या असून त्या अटी शिथिल करण्यात याव्यात अशी मागणी व्हाईस ऑफ मीडियाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष विजय चोरडिया यांनी केली, दरम्यान शिर्डी येथे 31 ऑगस्ट व 1 सप्टेंबर असे दोन दिवशीय होणाऱ्या पत्रकारांच्या अधिवेशनास सर्व पत्रकारांनी उपस्थित रहावे असे आवाहन धारूर येथील बैठकीमध्ये त्यांनी केले. यावेळी व्हाईस ऑफ मीडिया धारूर तालुका पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
व्हॉईस ऑफ मीडियाच्यावतीने अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या संदर्भात धारूर शहरातील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मराठवाडा अध्यक्ष विजय चोरडिया यांनी प्रमुख उपस्थिती लावून पत्रकारांना मार्गदर्शन केले.यावेळी जिंतूर तालुकाध्यक्ष भागवत चव्हाण यांच्यासह ते उपस्थित होते.चोरडिया म्हणाले की, पत्रकारांचे विशेषतः ग्रामीण भागातील पत्रकारांचे विविध प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रश्न प्रलंबित आहेत. ते प्रश्न व्हाईस ऑफ मीडियाने प्रशासन व शासन दरबारी मांडून त्यांची सोडवणूक करण्यासाठी पाठपुरावा सुरू केला असल्याचे त्यांनी सांगितले. सततच्या पाठपुराव्यामुळेच शासनाने पत्रकारांसाठी महामंडळ स्थापन करण्याची घोषणा केली असून त्यासाठी दोन सदस्य अभ्यास समिती गठीत करण्यात आली आहे.या मंडळाच्या माध्यमातून पत्रकारांना छोटे मोठे उद्योग उभे करण्यासाठी अर्थसाह्य उपलब्ध करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पत्रकारांना कुठल्या प्रकारची सुरक्षा नसल्यामुळे ते असुरक्षित असून त्यांची राज्यस्तरावर पत्रकारांची १० लाख रुपयांची विमा पॉलिसी उतरविण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. तर अधिस्विकृतीसाठी १० वर्ष पत्रकारिता केली असल्याचा अनुभव ग्राह्य धरून सरसकट पत्रकारांना अधिस्विकृती देण्यात यावी अशी आग्रही मागणी त्यांनी केली.तसेच शंकरराव चव्हाण कल्याण निधीच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या पेन्शनच्या अटीमध्ये सलग ३० वर्षे एका दैनिकात काम करणे ही अट रद्द करावी व २० वर्ष पत्रकारितेची सेवा ग्राह्य धरावी असे त्यांनी सांगितले. सदरील बैठकीचे आयोजन धारूर येथील शासकीय विश्रामगृहावर करण्यात आले होते.यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रकाश काळे, संदिपान तोंडे, सूर्यकांत जगताप, सुनील कावळे ,तालुकाध्यक्ष सचिन थोरात, कार्याध्यक्ष अतुल शिनगारे, बलाप्रसाद जाजु,ईश्वर खामकर, नाथा ढगे, सुनील कावळे,आतिक मोमीन, रवी गायसमुद्रे, अविनाश ठोंबरे, सुनील तोंडे, सतीश पोद्दार ,इरफान शेख, कैलास मुंडे,असलम शेख, विशाल सराफ, अविनाश जगताप, गोवर्धन बडे ,विठ्ठल वाघमोडे सह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.