आरटीई इंग्रजी शाळेतील मोफत प्रवेश प्रक्रियेसाठी पालकांनी अर्ज करावा- अ‍ॅड. सय्यद साजेद

किल्ले धारूर : – शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी आरटीई अंतर्गत इंग्रजी शाळेतील २५ टक्के जागांवरील मोफत प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे, शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) राबविल्या जाणाऱ्या २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेश देण्याची प्रक्रिया १६ एप्रिल पासून सुरू केली असल्याचे परिपत्रक राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयाकडून सोमवारी सायंकाळी प्रसिद्ध केले. त्यामुळे आरटीई प्रवेशाच्या प्रतिक्षेत असलेल्या पालकांना आपल्या पाल्याच्या प्रवेशाचा अर्ज येत्या १६ ते ३० एप्रिलपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अशी माहिती विश्व मानवाधिकार परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष अ‍ॅड. सय्यद साजेद यांनी दिली आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ कलम १२(१) (सी) नुसार खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास घटकांतील मुले व मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. शालेय शिक्षण विभागाने यंदा आरटीई प्रवेश प्रक्रियेत बदल केला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून एक किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांची शाळा नसेल तरच एक किलोमीटरच्या अंतरावरील स्वयंअर्थसाहाय्यित (इंग्रजी) शाळेत प्रवेश दिला जाणार आहे, शाळा निवडताना अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा आणि त्यानंतर स्वयंअर्थसाहाय्यित शाळा या प्राधान्यक्रमानुसार प्रवेश दिला जाणार आहे. त्यानुसार आरटीई प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने राबवली जाते आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली. पालकांनी आपल्या पाल्याचा आरटीई प्रवेश प्रक्रियेचा अर्ज अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज भरू शकतात. पालक https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईन अर्ज भरू शकतात, तरी सर्व पालकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन विश्व मानवाधिकार परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष अ‍ॅड. सय्यद साजेद यांनी केले आहे.

*या वर्षी जागा वाढल्या*
आरटीई प्रवेश प्रक्रियेत केलेल्या बदलामुळे यंदा मोठ्या प्रमाणात जागा वाढल्या आहेत. राज्यभरातील ७५ हजार ९८७ शाळांमधील ८ लाख ८५ हजार १४० जागा प्रवेशासाठी उपलब्ध झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता विद्यार्थी नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. यात जिल्ह्यात २ हजार ८१९ शाळांमध्ये २९ हजार २७० जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत.

तालुके शाळा प्रवेश
अंबाजोगाई २३१ २७८६
आष्टी २९७ ३०४०
बीड ४२१ ३६८७
धारुर १३७ १५२१
गेवराई ३६७ ४४९४
केज २७५ ३१०८
माजलगांव २६१ ३५०३
परळी २२४ १४२३
पाटोदा १८८ १५४७
शिरुर १९८ १४०२
बीड शहर १०१ १३५५
वडवणी १०७ १३३७
N/A १२ ६७
एकूण २८१९ २९२७०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *