पुणे येथे बजरंग सोनवणे यांचा पक्षप्रवेश यावेळी पत्रकार परिषदेस संबोधित : – शरदचंद्र पवार

गेले अनेक वर्ष बजरंग आपल्याबरोबर काम करत होते. मागच्या निवडणुकीमध्ये पक्षाने त्यांना संधी दिली आणि ५ लाखांपेक्षासुध्दा अधिक मतं त्यांनी घेतली आणि थोडक्यात त्यांचा पराभव झाला. नंतरच्या काळामध्ये काही स्थानिक प्रश्नामुळे ते पक्षापासून बाजूला गेले. संघटनेपासून बाजूला गेले, तरीसुध्दा त्यांनी नेतृत्वाशी संपर्क सतत ठेवलेला होता आणि म्हणून आम्ही सुचवलं, लहानसहान स्थानिक प्रश्नानं राजकारणामध्ये असं एकदम टोकाची भूमिका घेणं योग्य नाही. हे आपलं घर आहे, त्या घरामध्ये तुम्ही यायला पाहिजे. आणि ती तयारी त्यांनी यापूर्वीच केलेली होती.

आज लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. निवडणुकीचा कालावधी जाहीर झाला. बीड हे चौथ्या टप्प्यात येतं. याचा अर्थ, अजून एक महिनाभर आपल्याला निर्णय घेण्यासाठी वेळ आहे. संघटनेमध्ये काम करणाऱ्या अनेकांची इच्छा आहे की, लोकसभेला निवडणूक लढवावी. डाॅ. नरेंद्र काळे गेल्या काही महिन्यापासून जिल्ह्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन लोकांशी संपर्क साधत आहेत. आणि एकंदर पक्षाला अनुकूलतेचं कसं होईल याची काळजी घेत आहेत. जयसिंगराव यांनी तर गेले काही महिने घरातला मुक्कामच सोडला आहे. ते जातात त्या गावात झोपतात, जागा नसेल तर देवळामध्ये मुक्काम करतात. जवळपास एका दिवसामध्ये १०-१० गावांमध्ये त्यांची चक्कर आहे. आणि त्यांनी याठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने पक्षाचा विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अशा अनेकांमध्ये आज लोकसभेला जाण्याची तयारी आहे. पण शेवटी पक्षाच्या वरिष्ठ कमिटीची बैठक जयंतराव बोलवतील आणि त्या बैठकीमध्ये चर्चा करून निर्णय होईल.

मला एका गोष्टीचा आनंद आहे की, बजरंग सोनवणेंनी याठिकाणी भाषण करताना सांगितलं की, ‘जो काही पक्षाचा निर्णय असेल तो आम्हा सगळ्यांना मान्य आहे. बीड जिल्ह्याचा कार्यकर्ता एकत्र राहून पुन्हा एकदा जी काही मागच्या निवडणुकीत कमतरता आली, ती कमतरता दूर करून यश संपादन करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करेल,’ ही जी भूमिका त्यांनी मांडली, त्याबद्दल त्यांचे आणि सर्व कार्यकर्त्यांना मी अंतःकरणापासून धन्यवाद देतो. हा जिल्हा जरी दुष्काळी असला तरी महाराष्ट्रात पुरोगामी विचाराचे जे जिल्हे आहेत, त्यांमध्ये हा एक जिल्हा याठिकाणी अत्यंत सामान्य कुटुंबातले अनेक लोक हे देशाच्या राजकारणामध्ये, संसद व विधिमंडळामध्ये गेले आहेत, लोकांनी त्यांना निवडून दिलं आहे. इथे विचाराला पाठिंबा देतात. मला आठवतंय की, आमचे एक सहकारी होते, ते हल्ली हयात नाहीत. पण ते नगरचे होते. बबनराव ढाकणे हा एक लढवय्या कार्यकर्ता होता. बीडमध्ये निवडणुकीला उभे राहिले. त्यांचा जिल्हा अहमदनगर पाथर्डी, पण एक लढाऊ कार्यकर्ता म्हणून बीड जिल्ह्यातील जनतेने त्यांना शक्ती दिली, आणि त्यांना निवडून पाठवलं. अशी अनेक उदाहरणं बीडची सांगता येतील.

१९८० साली माझं सरकार गेलं आणि त्याच्यानंतर मी विरोधी पक्षाचा नेता झालो आणि निवडणुका लागल्या. बीड जिल्हा असा आहे की, या जिल्ह्यात मी प्रचारासाठी गेलो आणि सगळे आमदार मी सांगितले ते या जिल्ह्याने निवडून दिले. हा विक्रम या जिल्ह्याने केला आहे. म्हणून या जिल्ह्यातला सर्वसामान्य माणूस अडचणीत आहे, दुष्काळात आहे. अनेक समस्या आहेत. पण विचाराच्या बाबतीत इथं दुष्काळ नाही. विचाराच्या बाबतीत पुरोगामी भूमिका हा घेणारा हा जिल्हा आहे.

तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं याठिकाणी आलात, एकच गोष्ट आपण ठरवूया की, मागच्या निवडणुकीमध्ये जो आपल्याला धक्का बसला तो आपण दुरूस्त करू, बीडचं जे लौकिक आहे ते जतन करू, आणि एका विचारानं आपण कामाला लागू, पक्ष मजबूत करू. त्यामध्ये आपल्या सगळ्यांची साथ मिळेल याची मला खात्री आहे. मी बजरंग आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं याठिकाणी स्वागत करतो.
सविस्तर पहा : – https://youtu.be/9GBxN61wfL0?si=-Mp9Wjm-6Qbi-O5r

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *