शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक सदर शासन निर्णय दिनांक ०१ मे, २०२४ नंतर जन्माला आलेल्या व्यक्तींना लागू

विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रे, महसूली दस्तऐवज, जन्म व मृत्यू नोंदी दाखला, सेवापुस्तक, विविध परीक्षांची आवेदन पत्रे इत्यादी शासकीय दस्तऐवजांमध्ये आईचे नाव वेगळ्या स्तंभामध्ये दर्शविण्यात येते. तथापि, महिलांना पुरुषांबरोबर समानतेची वागणूक देण्यासाठी तसेच समाजामध्ये महिलांप्रती सन्मानाची भावना निर्माण करण्यासाठी तसेच एकल पालक महिला यांची संतती (अनौरस संतती) यांना देखील समाजामध्ये ताठ मानाने जगण्यासाठी शासकीय दस्तऐवजांमध्ये उमेदवाराचे नाव आईचे नाव नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरुपात नोंदविण्याचे बंधनकारक करण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय घेण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासकीय दस्तऐवजावर आईचे नाव बंधनकारक शासन निर्णय :-
खालील शासकीय दस्तऐवजांमध्ये आईच्या नावाचा समावेश वेगळ्या स्तंभामध्ये न दर्शविता उमेदवाराचे नांव आईचे नाव नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरुपात नोंदविण्याचे बंधनकारक करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. सदर शासन निर्णय दिनांक ०१ मे, २०२४ नंतर जन्माला आलेल्या व्यक्तींना लागू राहीलः-

१. जन्म दाखला
२. शाळा प्रवेश आवेदनपत्र
३. सर्व शैक्षणिक कागदपत्रे
४. जमिनीचा सातबारा, प्रॉपर्टीचे सर्व कागदपत्रे
५. शासकीय/निमशासकीय कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक
६. सर्व शासकीय/निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या सॅलरी स्लीपमध्ये (वेतन चिठ्ठी)
७. शिधावाटप पत्रिका (रेशनकार्ड)
८. मृत्यु दाखला
तथापि, सार्वजनिक आरोग्य विभागाने जन्म-मृत्यू नोंदवहीत आवश्यक त्या सुधारणा करुन नोंद घेण्यासाठी केंद्र शासनाशी विचारविनिमय करावा. तसेच केंद्र शासनाकडून याबाबत आदेश प्राप्त झाल्यानंतर जन्म/मृत्यु नोंदवहीत बालकाचे नाव आईचे नाव नंतर वडीलाचे नाव व आडनाव अशा स्वरुपात नोंद करण्यात यावी.
विवाहित स्त्रियांच्या बाबतीत सध्या अस्तित्वात असलेल्या पध्दती त्यांच्या विवाहानंतरचे म्हणजे तिचे नाव नंतर तिच्या पतीचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नाव नोंदविण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्यात यावी. तसेच स्त्रिला विवाहपूर्वीच्या नावाने मालमत्तेच्या दस्तऐवजामध्ये नोंदविण्याची मुभा ठेवण्यात येत आहे.
अनाथ व तत्सम अपवादात्मक प्रकरणी मुलांच्या जन्म/मृत्यु दाखल्यात नोंद घेण्याबाबत सुट देण्यात येत आहे.
सविस्तर वाचा : – https://youtube.com/shorts/wq4_Bnld_k4?si=E095J_bBiCaHGbUs

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *