केंद्र सरकारच्या अंतर्गत जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत सामंजस्य करार.
बीड जिल्ह्यात उद्योग क्षेत्रात गुंतवणुकीला चालना देण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्रातर्फे जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद घेण्यात आली. जिल्हाधिकारी आदरणीय दिपा मुधोळ मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या परिषदेत उद्योग घटकांसाठी सामंजस्य करार झाले. यातून जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना रोजगार मिळण्यास संधी उपलब्ध होणार असून उद्योग उभारतांना जिद्द, परिश्रम व चिकाटी कायम असू द्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी आदरणीय दिपा मुधोळ मॅडम यांनी केले.
शाश्वत विकास ध्येय साध्य करण्याच्या दृष्टीकोनातून उद्योग क्षेत्रात बीड जिल्ह्याचे नाव लौकीक करुन उद्योजकांनी जिल्ह्याच्या विकासासाठी योगदान द्यावे. जिल्ह्यातील तरुणांची बेरोजगारी दूर करण्यासाठी जिल्ह्यात मोठे उद्योजक निर्माण झाले पाहिजेत. जिल्ह्यातील सर्व इंडस्ट्रीजला जिल्हा प्रशासनाकडून योग्य ते सहकार्य केले जाईल. जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रातील प्रलंबीत प्रकरणे निश्चितच निकाली काढली जातील. उद्योग उभारण्यासाठी लागणाऱ्या जागेसाठी ना-हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हा प्रशासन सकारात्मक भुमिका घेईल असे त्यांनी यावेळी आश्वस्त केले.
उद्योग विभागामार्फत उद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी गुंतवणूकदार व व्यवसायिकांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याकरीता जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात आले असून बीड हा विकासासाठी केंद्रबिंदू मानून जिल्ह्यासह राज्याच्या विकासाला चालना देणे हा जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचा मुख्य उद्देश असल्याचे बीड जिल्हाधिकारी आदरणीय दिपा मुधोळ मॅडम यांनी सांगितले.
यावेळी जिल्ह्यातील विविध उद्योगाबाबत सामंजस्य करार उद्योग कंपन्यांशी करण्यात आले.यावेळी नर्मदा साॅल्व्हेंट & एक्श्ट्रक्शन एल.एल.पी किल्ले धारूर उद्योग समूहाने गुंतवणूक केली असता यावेळी बीड जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मॅडम यांच्या हस्ते बालाजी निर्मळ यांना MOU (Memorandum Of Understanding) सामंजस्य करारपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी बीड जिल्ह्यातील अनेक उद्योजक उपस्थित होते.