किल्ले धारूर महाविद्यालयामध्ये वाणिज्य विभागाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न
किल्ले धारूर दिनांक 11 मार्च रोजी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये वाणिज्य विभागातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ वाणिज्य मंडळातील प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात आला होता. याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व अध्यक्षीय समारोपातून विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्राचार्य डॉ. गोपाळ काकडे यांनी सांगितले की, आगामी काळात वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यानंतर प्रत्येकाने आपल्या करिअरच्या वाटचालीची दिशा निश्चित करणे गरजेचे आहे. आवड असलेल्या क्षेत्रात करियर निवडून विद्यार्थ्यांनी स्वतःचा व महाविद्यालयाचा नावलौकिक साध्य करून गौरव वाढवावा असे सांगितले. वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. विजयकुमार कुंभारे यांनी विद्यार्थ्यांना परीक्षा विषयी भावी शैक्षणिक वाटचाली बद्दल शुभेच्छा देऊन सर्वांनी चांगले यश मिळवावे असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. भारत दहे यांनी करून कार्यक्रम आयोजनामागील भूमिका व्यक्त व्यक्त केली. कार्यक्रमाकरिता महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. महादेव जोगडे, उपप्राचार्य मेजर डॉ. मिलिंद गायकवाड, पर्यवेक्षक प्रा. सिद्धेश्वर काळे यांची विचारमंचावर उपस्थिती होती. डॉ. मोरे, डॉ. उघडे, प्रा. आदित्य सोळंके यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. निरोप समारंभाच्या निमित्ताने अंतिम वर्षातील वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयास छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट दिली. यानिमित्ताने बालाजी फुके व कौस्तुभ खिंडरे या विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त करून अनुभव कथन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी प्राची अवगुणे व कुमारी सोळंके ऋतुजा यांनी केले तर आभार कुमारी पूजा लोकरे यांनी मानले. कार्यक्रमाकरिता महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.