डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत प्रशिक्षण
दीनदयाल शोध संस्थान कृषि विज्ञान केंद्र अंबाजोगाई व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) बीड यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत गटप्रमुख व सदस्य शेतकरी यांचे दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण संपन्न होत आहे. प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्राला मंचावर आत्मा प्रकल्प संचालक सुभाष साळवे, उपविभागीय कृषी अधिकारी अंबाजोगाई शरद शिनगारे व कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. वसंत देशमुख व दीनदयाल शोध संस्थान विशेष आमंत्रित सदस्य, कमलाकर आंबेकर यांची उपस्थिती होती.
प्रशिक्षण कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना वसंत देशमुख यांनी सांगितले की, दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षणाच्या माध्यमातून सेंद्रिय शेती, आपल्या शेतावर निर्माण करता येणाऱ्या सेंद्रिय निविष्टा निर्मिती, सेंद्रीय उत्पादनाचे प्रमाणीकरण, प्रमाणिकरण व मूल्यवर्धन यासारख्या विविध घटकांवर शेतकऱ्यांना माहिती व अनुभव देऊन सक्षम करण्यात येणार आहे.