कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतीचा विकास पुढे जात आहे
दीनदयाल शोध संस्थान कृषि विज्ञान केंद्र अंबाजोगाई व केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विशेष कापूस प्रकल्प’ अंतर्गत ‘शेतकरी मेळावा’ कार्यक्रमाचे आयोजन केंद्राच्या प्रक्षेत्रावर करण्यात आले होते. मेळाव्याचे उद्घाटक म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीचे कुलगुरू डॉ. इंद्र मनि यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. उपेंद्र कुलकर्णी (प्रकल्प प्रमुख, दीनदयाल शोध संस्थान बीड) होते. प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर नंदकिशोर मुंदडा (सामाजिक कार्यकर्ते, अंबाजोगाई ), दादा लाड (व्यवस्थापन समिती सदस्य, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर), किर्ती देशपांडे (उद्योजिका, छ. संभाजीनगर), डॉ. अर्जुन तायडे (मुख्य समन्वयक व प्रमुख (पिके) केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर), डॉ. अंगामुथू मनीकंदन (वरिष्ठ मृदा शास्त्रज्ञ, केंद्रीय कापूस संशोधन केंद्र), डॉ. प्रल्हाद जायभाये (प्राचार्य, कृषी तंत्र विद्यालय, बदनापूर जि. जालना), डॉ. वसंत देशमुख (वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख कृषी विज्ञान केंद्र अंबाजोगाई), डॉ. संजीव बंटेवाड (सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य, कृषी महाविद्यालय अंबाजोगाई), डॉ. वसंत सूर्यवंशी (विस्तार कृषी विद्यावेत्ता, अंबाजोगाई), डॉ. दीप्ती पाटगावकर (वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र खामगाव, गेवराई) यांची उपस्थिती होती.
मेळाव्याचे प्रास्ताविक करताना डॉ. देशमुख यांनी सांगितले की, बीड जिल्ह्यातील जमिनीत कापूस महत्त्वाचे पीक आहे. कापसाची उत्पादकता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील ५ तालुके व २८ गावांमध्ये अति-सघन लागवड पद्धतीचे तंत्रज्ञान कृषि विज्ञान केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात येत आहे. अतिसघन लागवड पद्धती तंत्रज्ञानाचा प्रचार-प्रसार व महिलांना एकत्रित आणून त्यांच्यामध्ये उद्योजकता निर्माण करणे; या उद्देशाने मेळावा आयोजित केला आहे.
कृषि विज्ञान केंद्राने तयार केलेल्या ‘शेतकरी यशोगाथा’ पुस्तिकेचे, ‘कापूस सघन लागवड’ माहितीपत्रक व ‘तूर उत्पादन तंत्रज्ञान’ घडीपत्रिकेचे मान्यवरांच्या शुभहस्ते प्रकाशन करण्यात आले.
कृषी क्षेत्रातील विविध घटकांमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून उल्लेखनीय कार्यासाठी कृषि विज्ञान केंद्राच्या कार्यक्षेत्रातील दहा शेतकऱ्यांना ‘भारतरत्न नानाजी देशमुख शेतकरी गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.