19 मार्चला का करतात उपवास?
अमर हबीब
19 मार्च 1986 रोजी साहेबराव करपे व त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या आत्महत्याने सारा महाराष्ट्र हादरला होता. साहेबराव करपे यांनी लिहिल्या चिठ्ठी, त्यांच्या मृत्यूने सरकार शेतकरी प्रश्नाकडे ध्यान देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. झाले उलटे. सरकारने घ्यावी त्या गोष्टीची दाखल घेतलीच नाही. शेतकऱयांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत गेले. देशात सुमारे पांच लाख शेतकऱयांना मृत्यू कवटाळावा लागला. शीतल भिसे असो की धर्मा पाटील असो की, सखाराम राठोड, रोज आत्महत्येची बातमी येते. आपण याचा कधी विचार करणार आहोत का की या आत्महत्या का होत आहेत? ह्या आत्महत्या कधी थांबतील? काय केले म्हणजे थांबतील?
सरकारे बदलली पण आत्महत्या थांबल्या नाहीत. कर्ज माफी केल्या तरी थांबल्या नाहीत. काय केले म्हणजे शेतकरी आत्महत्या थांबतील?
आम्ही याचा विचार केला. आमच्या लक्षात आले की, 1) कमाल शेतजमीन धारणा (सीलिंग) 2) आवश्यक वस्तू व 3) जमीन अधिग्रहण आदी शेतकरीविरोधी कायदे हेच आत्महत्यांचे मूळ कारण आहेत. ते रद्द करणे गरजेचे आहे.
या आत्महत्यांचे ऐकून मी अस्वस्थ होतो म्हणून 19 मार्च रोजी उपवास करतो! तुम्हीं अस्वस्थ होत असाल तर तुम्हीही करा.
आपण आपले काम करीत हा उपवास करू शकतो. हवे तर सामूहिक करू शकतो. मी ठरवले आहे! 2017 पासून लाखो किसानपुत्र हा उपवास करतात. हा उपवास कोण्या पक्षाचा, संघटनेचा नाही. हा उपवास प्रत्येक संवेदनशील माणसाचा आहे.
मला माहित आहे की, एक दिवसाच्या उपवासाने सरकार बधणार नाही. पण यातून आपल्या संवेदना व्यक्त होतील. आपण शेतकऱयांच्या बाजूने आहोत, हा निर्धार पक्का होईल. तोच शेतकऱयांच्या हातपायातील शृंखला तोडणारा ठरेल.
आपण एक दिवसाचा उपवास करू!
शेतकरयांच्या स्वातंत्र्याचा यथाशक्ती प्रयास करू!
अन्नदात्यासाठी अन्नत्याग करू!
●
अमर हबीब, आंबाजोगाई,
किसानपुत्र आंदोलन